Saturday, 17 August 2013

जय गडकोट

जय गडकोट

गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून महाराष्ट्रात गडकोट वैभव विपुल आहे.छत्रपती शिवाजीमहाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.

दुर्गमता हा गडाचा गाभा होता.शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई.नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले.मग दगडाची रचाई झाली.शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली.अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना 'पूर' म्हणत असत.
तरीही शत्रू बलाढ्य असेल,तर या तटबंदीयुक्त पुराचा पराभव अटळ असे. अशा वेळी गिरी-दुर्गाची रचना करण्यात आली.मात्र,असे गिरी दुर्ग बाधण्याचा खर्च अपरमित असे,परंतु संरक्षण या एकमेव कारणासाठी तो खर्च करणे अपरिहार्य असे.भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन,त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गाची निर्मिती केल्यामुळे किंवा दुर्ग उभारल्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळत असे.
मात्र,हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागले.त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला व त्यातूनच बेलाग दुर्ग उभारले गेले.परिस्थितीशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी केली गेली.वास्तुरचना,स्थापत्यशास्त्र यांचा कस पणाला लाऊन अशा गडकोटांची निर्मिती झाली.
आपल्याकडील अनेक जुन्या ग्रंथांमधून दुर्गांच्या प्रकाराची माहिती मिळते.मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात दुर्गांबद्दल केलेली चर्चा आली आहे.त्याचा आशय असा आहे-'राजाने दुर्गांच्या जवळ वसवलेल्या नगरातच आपले वास्तव्य ठेवावे.असे सहा प्रकारचे दुर्ग आहेत - १]धनुदुर्ग २] महीदुर्ग ३] अब्ददुर्ग ४] वाक्ष्रदुर्ग ५] नृदुर्ग ६]गिरिदुर्ग
ज्याच्या आजूबाजूस वीस कोसपर्यंत पाल नाही,त्यास 'धनदुर्ग' म्हणतात.
ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंच तटबंदी आहे,युद्धाचा जर प्रसंग आलाच तर ज्यावरून व्यवस्थित पहारेकर्यांना फिरता येईल,ज्याला झरोक्यानीयुक्त अशा खिडक्या ठेवल्या आहेत,अशा दुर्गास 'महादुर्ग' असे म्हणावे.
अपरिमित जलाने चोहोबाजूंनी वेढलेल्या दुर्गास 'अब्ददुर्ग' किंवा 'जलदुर्ग' अशी संज्ञा आहे.
तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसापर्यंत मोठमोठे वृक्ष,काटेरी झाडे,कळकाची बेटे आणि वेलींच्या जाळ्या यांनी वेष्टीलेल्या दुर्गास वृक्षसंबंधी म्हणजेच 'वाक्ष्रदुर्ग' म्हणतात.
गज,अश्व,रथ आणि पत्री या चतुरंग सैन्याने रक्षण केलेल्या दुर्गास 'नृदुर्ग' असे म्हणतात.
तर आसपास वर चढण्यास संकुचित मार्ग असणारा,नदी, झरे इत्यादिकांच्या जलानी व्यापलेला व धान्य निर्माण होण्यासारख्या क्षेत्रांनी युक्त असलेल्या डोंगरी गड हा 'गिरिदुर्ग' या सज्ञेस प्राप्त होतो.
२१ व्या शतकातील युवा पिढीसाठी या गडकोटांचे महत्व समजावून त्याचा अभ्यास करण्यास उदुय्क्त करण्यासाठी,त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी,गडाची बांधणी करताना तो डोंगर का निवडला,त्या भोवती असलेली साधनसामग्री,तेथे राहणारे लोक,त्या भागात असलेली पाण्याची व्यवस्था,तेथून मिळणारे शेताचे उत्पन्न या गोष्टींचा निश्चितच विचार करून गडांची बांधणी करत.

रामायण व महाभारतातही दुर्गांविषयी चर्चा केली आहे.त्याकाळातही दुर्गांविषयी अभ्यासपूर्ण दाखले आजही आपल्याला अनुभवास येतात.

शांतीपर्वामध्ये भीष्मांनी दुर्गाची महती सांगितलेली आहे.एके ठिकाणी भीष्म म्हणतात'एखादा आपल्यापेक्षा बलवान अशा राजाकडून आपल्याला त्रास होत आहे असे वाटल्यास,सुरक्षेसाठी बुद्धिमान राजाने दुर्गाचा आश्रय करावा...दुर्गाभोवती असणार्या क्षुद्र वृक्षाची मुळे तोडून टाकावीत...अश्वत्थ वृक्षाची मुळे मात्र तोडू नयेत.मोठमोठे वृक्ष असतील तर त्याच्या फांद्या तोडाव्यात.अश्वतथ दुर्गाच्या तटावर,कोण लोक येतात,कशासाठी येतात,त्याच्यासाठी त्यांच्यावर बारीक तेहलनी करण्यासाठी,त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व बाजूस किंवा चोहोबाजूंनी चौक्या ठेवाव्यात व त्यावर अतिशय शूर,चाणाक्ष लोकांचा पहारा असावा.
तटावरच्या लोकांना बाहेरच्या गोष्टी दिसण्याकरता भिंतीला झरोके असावेत.बाहेरून येणाऱ्या लोकांना आपणावर नजर आहे याची जाणीव असणार नाही.व वेळ प्रसंगी याच भोकातून तीर वैगेरेचा मारा करता येईल,अशी व्यवस्था करावी.
दुर्गाच्या भोवतालचा खंदक मासे,नक्र इत्यादींनी परिपूर्ण असावा,किंवा त्यात जागोजागी शूल उभे केलेले असावेत.नगरातल्या लोकांना संकटकाळी बाहेर निघता यावे म्हणून सूक्ष्म दरांची किंवा चोर दरवाजा-गुप्त भूयारांची योजना असावी.या दारावरही चौकी,पहारे असावेत.दुर्गाच्या जवळच किंवा अगदी थोड्या अंतरावर काही अचानक घडल्यास तातडीने सैन्याची कुमक पोचावी म्हणून सैन्याचा तळ असावा.
जेथे चिखल नसेल,पाणी जवळ नसेल,सेतू प्रकारादिकांचे भाग व ढेकळे नसतील अशाच ठिकाणी अश्वभूमी असावी किंवा तयार करावी.रथदलाला मात्र सपाट,चिखल व कुठेही शक्यतो खाचखळगे नसलेली जागा प्रशस्त म्हणजेच योग्य होय.
लहानलहान वृक्ष,अरण्य व जवळ पाणी किंवा हत्तीसाठी पुरेसे व मुबलक पाणी असलेला प्रदेश गजदलासाठी अतिशय योग्य.सभोवती डोंगराळ जागा,अनेक दुर्ग,तसेच कणक आणि देव यांनी प्रदेश युक्त असून,त्याच्या समीप पर्वत,उपवने असतील तर ती जागा पायदलासाठी प्रशस्त होय.सैन्यात पायदळ असणे सर्वदा श्रेयस्कर होय.
रामायणाचा जरी अभ्यास केला तरी त्या काळी दुर्गांची माहिती होती असे आढळून येते.
हनुमान लंकेत जाऊन आल्यावर त्याने लंकेच्या दुर्गाचे वर्णन केलेले आढळून येते गडांची निर्मिती करताना वापरलेले तंत्र,भौगोलिक परिसराचा अभ्यास,गडावर शत्रू पोचू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना,अडचणीच्या वेळी गडावरून सहज निघून जाता यावे म्हणून केलेई विशिष्ट गुप्त वाट तटबंदीवरून शत्रूला हेरण्यासाठी केलेले झरोके इत्यादी गोष्टींचा अभ्यास व त्याकाळातही अतिशय कल्पकतेने निर्मिलेले दुर्ग यांचा सर्व बाजूने विचार करणे २१ व्या शतकातही अतिशय महत्वाचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा गडकोट बांधले मात्र,याच गडकोट दुर्गांच्या जोरावर त्यांनी शत्रूला नामोहरम केले.साल्हेर अहिवंतापासूनते जिंजी तंजावरपर्यंत दुर्गांची शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.
शिवप्रभू एकदा म्हणाले,आज हजरतीस३६० दुर्ग आहेत.खासा आलमगीर एक दिवस दख्खनेत उतरेल.त्यावेळेस माझा एक एक दुर्ग त्यावेळेस एक एक वारूस झुंजवेल.औरंगजेबास अख्खी दख्खन काबीज करावयास साडेतीनशे वर्षाचे आयुष्य लागेल.
शिवप्रभूंच्या मृतुनंतर औरंगजेब दक्षिणेस पुरया ताकदीनिशी उतरला आणि पुढची २६ वर्ष तो इथेच राहिला.त्या अवधीत त्याने आदिलशाही,कुतुबशाही जिंकली,२०० वर्ष चाललेल्या या शाह्या औरंगजेबाने त्या एका आचमनात गिळल्या.परंतु गडकोटानी भरलेले हे मराठा राज्य काही त्याला जिंकता आले नाही.शेवटी हतबल होऊन हा दिलीन्द्र यमालयाक्षयास गेला ते हे राज्य.
गडकोट किल्ल्याच्या जोरावर मराठी साम्राजाला जिंकण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.