या देवी सर्वभूतेषु शक्तीरुपेण संस्थिता।
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः।।
सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीरुपाने वसलेल्या , दुर्गादेवीला माझा नमस्कार असो , अशा अर्थाचं हे सुभाषित. आदिशक्ती , आदिमायेचं स्मरण आपण रोजच करतो. समाजातील दुष्प्रवृत्तींचा सामना करण्याचं सामर्थ्य हीच दुर्गादेवी आपल्याला देत असते. या शक्तीशाली आदिमायेचा , जगदंबेचा उत्सव म्हणजे नवरात्र... आज या उत्सवाचं असं वर्णन केलं तर अनेकांना कळणार नाही. दरवर्षी दोन नवरात्रोत्सव येतात की काय , असं काहींना वाटेल. कारण , हा आदिमायेचा उत्सव असेल तर मग नऊ दिवसांचा नृत्योत्सव वेगळाच असायला हवा , नाही का ? पण , पारंपरिक नवरात्रोत्सवालाच हल्ली नृत्योत्सवाचं स्वरूप आलंय , असं खेदानं सांगावं लागतं.
एका कोप-यात दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करायची आणि नऊ दिवस रिमिक्सच्या तालावर नाचायचं , अशीच आजच्या नवरात्रीची व्याख्या करावी लागेल. प्रत्येक गल्लीत , किंबहुना प्रत्येक इमारतीत हल्ली नवरात्रीचे नऊ दिवस गरबा रंगतो. बरं , त्याला गरबा म्हणणंही तसं धाडसाचंच. कारण तो असतो , चक्क धांगडधिंगा. कुणीही , कुणासोबतही आणि कसंही नाचत असतं. बेताल , बेधुंद. परंपरा जतन करायची म्हणून नवरात्रोत्सव साजरा करणारी मंडळी किंवा मंडळं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाहीत. खरं तर , हा सण आहे मातृपूजनाचा. हे नऊ दिवस आहेत , आसुरी विचारांवर विजय मिळवण्याचे , संघशक्तीचे महत्त्व आणि भक्तीचा महिमा समजावण्याचे आणि तपश्चर्येची महत्ता व एकता जाणून घ्यायचे.
अश्विन महिन्यात येणा-या या नवरात्रोत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महिषासूर नावाचा एक राक्षस अतिशय सामर्थ्यशाली बनला होता. त्याने सर्वच देवांना आणि मानवाला त्रास द्यायला सुरुवात केली होती. दैवी विचारांचे तेज धुसर झालं होतं आणि त्यामुळे लोक भयग्रस्त झाले होते. धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्मा , विष्णु , महेशाची आराधना केली. देवांच्या प्रार्थनेनं प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवीशक्ती निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करून ती सांभाळली , तिचे पूजन केले. तिला स्वतःच्या दिव्य आयुधांनी मंडित केली. या दैवी शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून महिषासुराला मारले. आसुरी वृत्तीचा नाश करून दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवांना अभय दिलं. ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा. तिच्या पूजनाचे नऊ दिवस म्हणजेच नवरात्र. या नऊ दिवसांत आईजवळ शक्ती मागायची आणि आसुरी वृत्तीवर विजय मिळवायचा. महिषासूररुपी राक्षस आजही प्रत्येक माणसाच्या मनात , एका कोप-यात बसलेला आहे. त्याची माया ओळखून त्यापासून दूर राहण्यासाठी गरज आहे , दैवी आराधनेची. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस तेच नवरात्रीचे दिवस !
नवरात्र हा सण आपल्या आईच्या पूजनाचा आहे , हा विचार जेव्हा आपण करू , तेव्हाच त्याच्या साजरीकरणाचं रूप-स्वरूप बदलू शकेल. कलीयुग वगैरे गोष्टींवर आपला विश्वास असो नसो , कदाचित ती अंधश्रद्धाही असेल. पण आजच्या जगात स्वार्थी , विघातक वृत्तीची माणसं वाढत आहेत , हे कुणीही मान्यच करेल. ही माणसं , त्यांची ही वृत्ती म्हणजेच आजचा महिषासूर आहे. देशभरात , नव्हे जगभरात आज विध्वंसक प्रवृत्ती वर्चस्व गाजवत आहेत. सर्वत्र घबराट पसरवण्याचे त्यांचे मनसुबे यशस्वी झाले आहेत , होत आहेत. अशावेळी या महिषासुरावर अंकूश ठेवण्यासाठी , त्याला नामोहरम करण्यासाठी आईजवळ सामर्थ्य मागण्याची गरज आहे.
आपल्या वेदांनीही शक्तीच्या उपासनेला फारच महत्त्व दिलंय. महाभारताचं प्रत्येक पान बलोपासना आणि शौर्यपूजेनं भरलेलं आहे. तुम्हाला जर धर्माची मूल्य टिकवायची असतील तर हात जोडून बसून चालणार नाही , शक्तीची उपासना करावी लागेल , असा उपदेश महर्षी व्यासांनी पांडवांना केला होता. असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी त्या उपदेशाचे आचरण आजही करायची गरज आहे. संघे शक्तिः कलौ युगे। ही गोष्ट नवरात्रीच्या काळात लक्षात घेतली पाहिजे. जगदंबेच्या भक्तीनेच ही शक्ती प्राप्त होते , हे सुचवण्यासाठीच नऊ दिवस देवीच्या भोवती रिंगण करून रास किंवा गरबा खेळला जातो. त्यामुळे गरबा आवर्जून खेळावा , पण त्यामागचं हे शास्त्रही जपण्याचा प्रयत्न करावा. यावर्षी देवीभोवती फेर धरून गरबा खेळताना , देवीची प्रार्थना करा आणि तिच्याकडे एकच मागणं मागा. हे आदिशक्ती , तू आम्हाला शक्ती दे !
No comments:
Post a Comment