Friday, 11 January 2013

"गड आला पण सिंह गेला" नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची साक्ष किल्ले श्री. सिंहगड( कोंढाणा

"गड आला पण सिंह गेला"
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची साक्ष

किल्ले श्री. सिंहगड( कोंढाणा )

पुण्याच्या नैर्‌ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर,तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

नाव सिंहगड
उंची ४४००मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव सिंहगड
डोंगररांग भुलेश्वर
 


इतिहास

सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार
याचे आधीचे नाव कोंडाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता..


"पुणे दरवाजा"
सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.
पहा सिंहगडाची लढाई


आजचा सिंहगड
या युद्धाबाबत सभासद बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मगसूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

गडावरील ठिकाणे

दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
श्री अमृतेश्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.
कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्‍या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्चइ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ व नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

गडावर जाण्याच्या वाटा
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.
मार्ग
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.
स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.

No comments:

Post a Comment